नमुंमपा दिवाळे शाळेला महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी विद्यालय नामकरण
महाराष्ट्र शासनाने ज्यांच्या अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, स्वच्छता क्षेत्रातील महनीय कार्याचा गौरव राज्यातील सर्वोच्च अशा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने केला अशा ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नामकरण दिवाळे गांवातील महानगरपालिकेच्या शाळेला केल्याने शिक्षकांसमोर त्यांच्या विचारांचे अनुकरण व विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या विचारांचा आदर्श कायम राहील अशा शब्दात नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी भावना व्यक्त केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून दिवाळे गांवातील शाळा क्र. 2 चे 'महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी विद्यालय' अशा नामकरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. माझे वडील ज्या शाळेचे 12 वर्षे मुख्याध्यापक होते त्या शाळेचे नामकरण करण्याचा योग महापौर म्हणून मला लाभला आणि नानासाहेबांसारख्या 'माणसांमध्ये देव बघा आणि तो जागृत करा' अशी शिकवण देणा-या व्यक्तीचे नामकरण करण्याचे भाग्य लाभले हा दुग्धशर्करा योग असल्याचे महापौरांनी म्हटले. नवी मुंबईचे देशातील स्वच्छतेमधील मानांकन सतत उंचावत असून यामध्ये नानासाहेबांच्या विचारांनी भारलेल्या श्री सदस्यांच्या कार्याचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, स्थानिक नगरसेविका श्रीम. भारती कोळी, माजी नगरसेविका श्रीम. वर्षा नाईक, माजी परिवहन सभापती श्री. प्रदीप गवस, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. ऋतिका संखे, मुख्याध्यापक श्री. दिवेकर सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी नानासाहेबांनी समाजसुधारणेचे आभाळाएवढे काम केले असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा अंगिकार केला तर जग सुंदर होईल अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. या शाळेत येणा-या मुलांवर नानासाहेबांचे नाव पाहून आपोआप सेवाभावी उत्तम संस्कार घडतील असा विश्वास व्यक्त करीत आ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील स्वच्छता अभियानात श्री सदस्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
याप्रसंगी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेले श्री सदस्य कोणत्याही निमंत्रणाविना केवळ नामकरण समारंभाची माहिती समजल्याने उपस्थित असून यातच नानासाहेबांच्या थोर कार्याची व जनमानसावर असलेल्या त्यांच्या प्रभावाची प्रचिती येत असल्याचे सांगत स्थानिक नगरसेविका श्रीम. भारती कोळी यांनी हे नामकरण सूचविण्याचे भाग्य लाभले अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेसमोरील पटांगणात श्री सदस्यांची शिस्तबध्द बैठकी उपस्थिती लक्षणीय होती.