राष्ट्रीय जंतनाशक दिवस

*राष्ट्रीय जंतनाशक दिवस* 
राज्यामध्ये आरोग्य विभागातर्फे १० फेब्रुवारी हा जागतिक जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त ०१ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक औषध देऊया, सशक्त व सुदृढ करुया...जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये ०१ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून (कृमी) धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव. या कृमीदोषांचा संसर्ग मुलांना दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक असून, मुलांना आरोग्याच्यादृष्टीने अशक्त करणारा आहे. कृमीदोषामुळे रक्तक्षय आणि कुपोषण तर वाढतेच. परंतु त्यामुळे बालकाची बौध्दिक व शारीरिक वाढही खुंटते.


भारतामध्ये ०६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ०७ बालकांमध्ये रक्तक्षयाची लागण होते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. पाच वर्षांखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी सुमारे ३४ टक्के आहे. मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमिदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात सुमारे २० टक्के आहे. बालकांमधील कृमिदोषाचे प्रमाण कमी व्हावे व बालक सशक्त व सुदृढ बनावे यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा, १० फेब्रुवारी आणि १० ऑगस्ट रोजी राबविण्यात येतो. ०१ ते ०६ वर्षे वयोगटातील सर्व बालके, ०6 ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणारी व शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी (औषध) देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. *पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय व दृष्टी फाऊंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर उपक्रम  सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी१० ते दुपारी २.००पर्यंत एस.जी.डी. पब्लिक स्कूल, प्लॉट नं.२८,सेक्टर-१०,खांदा कॉलनी येथे १ ते१९ वयोगटातील मुला-मुलींना मोफत जंतनाशक गोळीचा डोस देण्यात येणार आहे.* 
 तसेच शासकीय रुग्णालयात, आंगणवाडी,आरोग्य केंद्रातही राबविण्यात येतो.तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना जंतुनाशक गोळीचा डोस द्यावा.