ठाणे, ता. 10 : मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय बंद असल्याने आजपासून ठाण्यातील महापालिकेच्या हिरानंदानी येथील डायलेसीस सेंटर येथे सकाळपासून 20 तर हाजुरी येथील जितो रुग्णालय येथे 9 अशा एकूण 29 रुग्णांवर डायलेसीस करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर यांनी दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने तातडीने ठाण्यात डायलेसीस सेंटर सुरू केल्यामुळे चिंताग्रस्त रुग्णांना दिलासा मिळाला असून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय हे बंद करण्यात आले आहे. या रुगणालयात गरीब व गरजू रुग्ण डायलेसीस करण्यासाठी येत होते, मात्र हे रुग्णालय बंद केल्याने रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब समजताच महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर, डॉ. आर. टी केंद्रे, उपायुक्त संदीप माळवी, मनिष जोशी यांच्यासमवेत तातडीची बैठक घेवून ठाण्यातील रुग्णालयात डायलेसीस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
काळसेकर रुग्णालयातून डायलेसीस रुग्णांची यादी घेवून महापालिकेच्यावतीने या रुग्णांना रुगणवाहिकेतून आणून डायलेसीस झाल्यानंतर पुन्हा घरी नेवून सोडण्यात आले. आज एकूण 29 रुग्णांवर डायलेसीस करण्यात आल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. तसेच दररोज अशा रुग्णांवर डायलेसीस करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या प्रतिबंध करण्यासाठी सर्वच डॉक्टर लढत आहे, या परिस्थीतीत डायलेसीस रुग्णांची गैरसोय लक्षात घेवून तातडीने ठाण्यातील रुग्णालयात व्यवस्था केल्याबद्दल महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर, डॉ. आर.टी. केंद्रे, जितो रुग्णालयाचे महेंद्र जैन यांचे महापौर नरेश म्हस्के यांनी आभार व्यक्त केले आहेत.
---