ठाणे, ता. 9 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव उपाय असून सर्वत्र याची अंमलबजावणी करण्यात येत आहे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रुगणालयात संशयित व कोरोनाबाधीत रुगण सापडल्याने अशी रुगणालये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली आहे, यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालय बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी डायलेसीस रुग्णांची गैरसोय होत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या डायलेसीस रुगणांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयात दररोज 50 हून अधिक रुग्णांचे डायलेसीस होत होते, मात्र, सद्यस्थीतीत हे रुगणालय बंद असल्यामुळे डायलेसीस होणार की नाही तसेच सध्या कोरोनामुळे देखील रुगणांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या रुगणालयात उपचार घेणारे रुग्ण हे गरीब व गरजू असल्यामुळे त्यांना इतर रुग्णालयात उपचार घेणे आर्थीकदृष्टया परवडणारे नसल्यामुळे रुगणांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ही बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने महापौर महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, परिमंडळ 1 उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त संदीप माळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर, कोविड प्रतिबंधसाठी नेमण्यात आलेले विशेष क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे उपस्थीत होते.
बैठकीमध्ये मुंब्रा येथील काळसेकर रुगणालयात डायलेसीस उपचार घेत असलेल्या रुग्णांची गैरसोय होवू नये त्यांची पर्यायी व्यवस्था ठाण्यातील महापालिकेचे वाडिया हॉस्पीटल, कोपरी येथील लखीमचंद फतिमचंद रुगणालय तसेच हाजुरी येथील जितो रुग्णालय येथे करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. याबाबत काळसेकर रुग्णालयातून डायलेसीससाठी असलेल्या रुग्णांची यादी मागविण्यात आली असून त्यानुसार दररोज महापालिकेच्या आरोग्य विभागातून या रुगणांशी संपर्क साधून त्यांना डायलेसीस केले जाणार आहे, यासाठी महापालिकेच्यावतीने रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या रुगणाला घरापासून थेट रुग्णालयात नेले जाणार आहे व डायलेसीस नंतर पुन्हा घरी सोडले जाणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले. त्यामुळे काळसेकर रुगणालयात सध्या उपचार घेत असलेल्या डायलेसीस रुग्णांनी घाबरुन न जाता महापालिकेने सुरू केलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केले आहे.
यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर यांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करुन काळसेकर रुगणालयात उपचार घेत असलेल्या डायलेसीस रुगणांबाबत योग्य ती काळजी घेण्यात येईल असे या बैठकीत नमूद केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या यानिर्णयामुळे निश्चीतच रुग्णांना दिलासा मिळाला असून त्यांनी खासदारांचे आभार व्यक्त केले आहे. ठाणे महानगरपालिका ही सद्यस्थीतीत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी युध्दपातळीवर रुग्णसेवा देत असून इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी सज्ज झाली असून याकामी सर्वांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.