विधानपरिषदेवर बिनविरोध निवड,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार;

*मुंबई:* उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली असून राज्य सरकारसमोरील संकट अखेर संपलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी वरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण अखेर उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासहित इतर आठ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.


शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.


करोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.


पक्षनिहाय उमेदवार
शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी
भाजप – प्रवीण दटके , रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर
काँग्रेस – राजेश राठोड