कोव्हीड-19 उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभाग कार्यालय निहाय समन्वय अधिकारी  


      कोव्हीड-19 चा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  विविध उपाययोजना केल्या जात असताना त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर व्यवस्थितपणे होण्याकरीता नियंत्रक म्हणून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी 8 विभाग कार्यालय क्षेत्रांकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.


      यामध्ये बेलापूर विभागाकरीता उपायुक्त डॉ. राहुल गेठे, नेरुळ विभागकरीता मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, वाशी विभागकरीता मुख्य लेखा परिक्षक श्री. दयानंद निमकर, तुर्भे विभागाकरीता उपायुक्त कर विभाग श्री. अमोल यादव, कोपरखैरणे विभागाकरीता परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, घणसोली विभागाकरीता अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे, ऐरोली विभागकरीता मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व दिघा विभागाकरीता उदयान विभागाचे उपायुक्त श्री. मनोज महाले आदी अधिकाऱ्यांची विभाग कार्यालय क्षेत्रनिहाय कोव्हीड-19 उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.


      या समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या विभाग कार्यालय क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकिय अधिकारी यांनी कोव्हीड-19 पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांची अदययावत यादी संबंधित विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त यांनी प्राप्त करुन घेतल्याबाबत खात्री करुन घ्यावयाची आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.06/06/2020 रोजीच्या परिपत्रकानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही होत असल्याबाबत देखरेख व नियंत्रण ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्राची (Special Containment Zone) प्रभावी अंमलबजावणी होत असल्याबाबत खात्री करुन घ्यावयाची आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


      त्यासोबतच दाटीवाटीची वस्ती/ झोपडपट्टी क्षेत्र अथवा घरी विलगीकरण (Isolation) करणे शक्य नाही अशा कोव्हीड-19 संशयित / पॉझिटिव्ह रुग्णांना महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटर (CCC) मध्ये संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करणे तसेच इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या कोमॉर्बिड रुग्णांना डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) मध्ये दाखल करणे अनिवार्य राहील. अशा प्रकारची योग्य कार्यवाही होत असल्याबाबत समन्वय अधिकारी यांनी लक्ष ठेवून दक्षता घ्यावयाची आहे.


      त्याचप्रमाणे सर्व प्रभावित भागात मास स्क्रिनींग करणे, आवश्यकतेनुसार तपासणीसाठी स्वॅब घेणे व अशा रुग्णांना विलगीकरण करणेबाबत सूचना दिल्या जातील यावर लक्ष ठेवायचे आहे. याशिवाय संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या कोव्हीड केअर सेंटर / डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर / डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल येथील पायाभूत सोयीसुविधा योग्य असल्याबाबत खातरजमा करावयाची आहे आणि आवश्यकतेनुसार संबंधितांकडून सुधारणा करुन घ्यावयाच्या आहेत. तसेच या तिन्ही ठिकाणच्या बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती अद्ययावत राहील याची दक्षता घ्यावयाची आहे.


      कोव्हीड-19 बाबतच्या उपाययोजना प्रत्यक्ष राबविताना त्यामध्ये सूसुत्रता असावी या दृष्टीने महापालिका आयुक्त्‍ श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी विभाग कार्यालय क्षेत्रनिहाय विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून याव्दारे कोव्हीड-19 नियंत्रण व प्रतिबंध मोहिमेला नियोजनबध्द गतीमानता प्राप्त होणार आहे.