प्रतीकात अडकलेली मानसिकता

 















प्रतीकात अडकलेली मानसिकता

 

 

आषाढीच्या वारीतला टाळमृदंगाचा, हरीनामाचा गजर यंदा कोरोन्टाईन झाला. राज्यातील शेकडो पालख्या, दिंड्यातून लाखो वारकरी वर्षानुवर्षे विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. यावर्षी लॉकडाऊनमुळे या हजारो वर्षाच्या परंपरेला खंड पडला.हजारो वर्षाच्या या परंपरेचे रहस्य आणि विठ्ठलाचा इतिहास यावर अनेक इतिहासकारांनी संशोधकांनी आपले विचार मांडले. सध्या सोशल माध्यमातून ‘पंढरपूरचा विठ्ठल हा भगवान बुद्ध आहे’ अशी चर्चा सुरू आहे. बौद्धांच्या मते विठ्ठलाची मूर्ती ही भगवान बुद्धाची आहे, तर याला वैष्णव पंथीय लोक विष्णूचे स्थान मानतात. जैनधर्मीय यास नेमिनाथ समजतात तर  काहींच्या मते हे स्थान शिवाचे होते. त्यामुळे विठ्ठलाचा इतिहास काय? याचा उहापोह करणे क्रमप्राप्त.

पंढरपूरचे विठ्ठल मंदीर हे बौद्ध विहार आणि त्यातील विठ्ठल मूर्ती ही बुद्धमूर्ती आहे काय? हे शोधण्यासाठी आपण वैज्ञानिक अभ्यासपद्धतीच्या अवस्थेतून विवेकपूर्वक निरीक्षणे, पुरावे, वस्तूनिष्ठता तार्किक तत्वज्ञानाच्या आधारे समस्यासूत्रण, वर्गीकरण, अभ्युपगम, सामान्यीकरण आणि पूर्वकथनाच्या अनुमानातून शोध घेऊ. हे करताना आपल्याला भारतातील धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा इतिहास पहावा लागेल. भारताच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकल्यास तत्कालीन सामाजिक संरचना धार्मिक संरचनेवर आधारीत होती, हे लक्षात येते. धार्मिक संरचना वर्णाधारीत असल्यामुळे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शुद्र हे संवर्णात तर आदिवासी, गुन्हेगार जाती-जमाती, अस्पृश्य हे अवंर्णात गणले गेले. संवर्गातील शुद्रासह अवर्णातील सर्व वर्गासोबत उच्चवर्णीयांनी अमानवीय वर्तणव्यवहार केला, याची साक्ष इतिहास देतो. आदिम काळातील मानवी जीवनपद्धतीच्या मुलभूत प्रेरणा मुख्यत: भूक, भय, मैथुन, निद्रा इ.आपण इतिहासात पाहिले. धर्म माणसाला कसा चिटकला याच्या खोलात आपल्याला जाण्याची गरज नाही. पण, ‘देव’ या शब्दाचा अर्थ काय ? हे तपासल्यास सामान्य माणसातली विशेष व्यक्ती म्हणजे ‘देव’ असा त्याचा अर्थ. पंरतु देव या शब्दाचा खरा अर्थ लपवण्यात आला, आणि नष्टही करण्यात आला, असे घटनाकार डॉ.आंबेडकर यांचे संशोधन आहे. ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ ग्रंथात ते म्हणतात की, इ.स.563 मध्ये सिद्धार्थचा जन्म नेपाळजवळील कपिलवस्तू येथे राजघराण्यात झाला. आर्यातील सामाजिक आणि धार्मिक वाईट चालीरितींना कंटाळून बुद्धाने गृहत्याग केला. तत्कालीन तत्वज्ञानींकडून बुद्धाने ज्ञान घेतले. विविध आश्रमाला भेटी दिल्या. समस्या सुटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बुद्धांनी चिंतन केले. चिंतनाला विज्ञानाधरीत सैद्धांतीक जोड देऊन ज्यांनी नवीन मार्ग दिले. वैराने वैर मिटत नाही. तर ते वाढते, असे बुद्ध म्हणतात. वयाच्या 35 व्या वर्षी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली. पुढे बुद्धांनी आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. सुखी जीवनासाठी नैतिक आचरणाची बुद्धाची शिकवण होती. समाजविकासासाठी बंधुतेसोबत लोकतांत्रीक भावनांची वृद्धी आवश्यक असल्याचा उपदेश त्यांचा होता. तत्कालीन समाजाला बुद्धाचा धम्म क्रांतीकारी, मानवतावादी, विज्ञानवादी वाटल्यामुळे भारतासह जगभरात त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. बुद्धाच्या सिद्धांताला पंचशिल म्हणतात. बुद्धधर्माच्या अवनतीची आणि र्‍हासाची चर्चा घटनाकारांनी विसृत केली. बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव ज्या - ज्या प्रदेशात होता त्या प्रदेशातील लोक बुद्धाच्या तत्वावर वर्तनव्यवहार करत असत. त्यामुळे बुद्धकालीन गणराज्ये प्रजासत्ताकाने बहरले होते.

इ.स.पूर्व 304 ते 223 या कालखंडात सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्विकार करून आशिया खंडात प्रचार आणि प्रसार केला. या कालखंडात 85 हजार बौद्धविहार (मठ) बांधल्याची नोंद प्रकाश अल्मेडा यांनी आपल्या ग्रंथात घेतली. याच कालखंडात अशोकाने 23 विश्वविद्यालये निर्माण केले. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिल, कंधार विश्वविद्यालये ही त्यांची उदाहरणे. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, गुफा (लेणी ह्या मौर्य कलेच्या प्रतिकांच्या व प्रतिमांच्या रूपाने आजही दिसतात. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील वेरूळच्या लेण्या हा गुफा शिलालेखाचा उत्तम नमुना. शिलालेख, स्तंभलेखासह दहा वर्णनाच्या लेखांची नोंद 'सम्राट अशोक आणि त्यांचा इतिहास' या ग्रंथात डी. नंदबोधी महाथेरो यांनी दिली.  पुरातन खोदकामात आजही बौद्धकालीन संस्कृतीच्या खुणा, त्याचे अवशेष आपल्याला वारंवार आशिया खंडभर निघताना दिसतात. सम्राट अशोकानंतर भारतात परकीयांनी शिरकाव करून बौद्ध लेण्या, विहार, प्रतिके आणि प्रतिमांची नासधूस केली. धम्म प्रचारकांच्या हत्या केल्याचे पुरावेही इतिहासात सापडतात. याबाबत विसेन्ट स्मिथ यांचे मत घटनाकारांनी क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथात नोंदवले. स्मिथ म्हणतात की, सनातनी  ब्राह्मणांद्वारा केल्या गेलेल्या अत्याचारापेक्षाही मुस्लिम आक्रमकांनी जे भिषण हत्याकांड केले ते कित्येक पटीने मोठे होते. आणि भारताच्या कित्येक प्रांतातून बौद्ध धर्म नष्ट होण्याला मुस्लिमसह, सनातनी जबाबदार आहेत. तेव्हा भिख्खू संघांनी विदेशातही पलायन केल्याचा इतिहास आहे.

पांडुरंगाची मूर्ती ही बुद्ध मुर्ती आहे का? आणि पांडूरंगाचा इतिहास काय? रामाचा इतिहास रामायणात, कृष्णाचा इतिहास भागवत पुराणात किंवा महाभारतात आढळतो, तसा विठ्ठलाचा इतिहास धर्मग्रंथात आढळत नाही. किंबहुना: ते स्पष्ट होत नाही. हजारो वर्षापासूनची पंढरपूरची आषाढी वारी वारकरी सांप्रदाय करतात, हा इतिहास आहे. पण वारकरी सांप्रदायातील संतांनी आपल्या अभंगातून, ओव्यातून पांडूरंगाचा उल्लेख बुद्ध म्हणून केला आहे. वारकरी सांप्रदायातील संत जनाबाई म्हणतात. ‘होऊनिया कृष्ण, कंस वधियेला | आता बुद्ध झाला, सखा माझा | (344) या ओवीतील प्रमाण हे सिद्ध करते की, पांडुरंग हा कृष्ण अवतार सांगितला जात असला तरी, तो खरा बुद्ध आहे. संत जनाबाईच्या अनेक ओव्यातून त्यांनी हे प्रमाण दिले आहे. संत बहिनाबाई म्हणतात, कलयुगी बौद्ध, रूप धरी हरी। तुकोबा शरीर प्रकटला॥ संत नामदेवांच्या संतवचनातून ते म्हणतात की, मध्ये झाले  मौन, देव निजे ध्यानी। बौद्ध ते म्हणोनी नावरूप॥ (2105) संत तुकारामही आपल्या अभंगातून हे दाखले देतात. बौद्ध अवतार माझीया आत्ताष्ठ। मौन्य मुखे निष्ठा धरियेली॥ संत एकनाथ महाराजही पंढरपूरचा पांडुरंग बुद्ध असल्याचे अभंगातून सांगतात. ते म्हणतात की, नववा बैसे स्थिररूप। तया नाम बौद्धरुप॥ संत तया दारी निष्ठिताति निरंतरी। (अभंग 2560) असे अनेक दाखले देऊन वारकरी सांप्रदायातील संतांनी पांडुरंग हा बुद्ध असल्याचे सांगितले आहे.

यासंदर्भात घटनाकार डॉ.आंबेडकर म्हणतात की, विठोबाचे ‘पांडूरंग’ हे नाव पुंडरीक म्हणजे कमळ आणि कमळालाच पालिमध्ये पांडूरंग म्हणतात. म्हणजे पांडूरंग दुसरा तिसरा कुणी नसून बुद्धच होय. (डॉ.आंबेडकर चरित्र, कीर, पृ.501) इंडियन एक्टिक्वेरी(भाग दहावा) मध्येही पंढरपूर हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते, आता हिंदुंचे झाले असा उल्लेख आहे. (श्री.विठ्ठल आणि पंढरपूर, लेखक-ग.ह.खरे, पृ 149) सम्राट अशोकाने बुद्धाची 84 हजार देवळे (विहार) बांधली त्यापैकी हे एक मंदीर असावे, असे सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या मेमरी ऑफ द केवी टेम्पल या ग्रंथात हे मंदीर बौद्ध असल्याचे म्हटले आहे. (धर्मपद, अ.रा.कुलकर्णी, या ग्रंथाचे परिशिष्ठ पहा) मा.शं.मोरे आपल्या महाराष्ट्रातील ‘बुद्ध धम्माचा इतिहास’ मध्ये लिहितात की, महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा लोप झाल्यावर अनेक बौद्ध विहार, लेणी, बौद्ध धार्मिक स्थळांचे हिंदुकरण करण्यात आले. संत एकनाथ, तुकाराम हे संतश्रेष्ठच जर विठ्ठलाला बुद्धरूप मानतात तर मग पंढरपूरचे विठ्ठल मंदीर बौद्धांचा विहार होता हे सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्याची काय गरज?

भारतातील इतिहासात धार्मिक, राजकीय, सामाजिक क्रांत्या-प्रतिक्रांत्या झाल्या. यात प्रतिके आणि प्रतिमांची तोडमोड करण्यात आली. परकीय आक्रमणात अनेक धार्मिक स्थळामधील प्रतिके, प्रतिमांचे विदृपीकरण करण्यात आले. डॉ.आंबेडकरांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार असल्याचे सांगितले असले तरी, पंढरपूरची वारी करायला सांगितले नाही हे बौद्धांनी लक्षात ठेवावे हे विचारवंत गौतमीपुत्र कांबळे यांचे विधानही समजून घेणे अपेक्षित. इतिहास म्हणून पांडुरंग म्हणजे बुद्ध असे दिसत असले तरी, त्याला आज प्राप्त झालेली भक्तीची अवस्था माणसाला विवेकाचा विसर पडावयास भाग पडते! विवेकाचा अभाव व्यक्तीला गुलाम करण्यास सोपा जातो. त्यामुळे आज खरी गरज आहे विवेकाची कास धरण्याची. वारी करण्याची नव्हे. नवा जन्म घेण्यासाठी जुने टाकून द्यावे लागते. ज्या कुणाला नवा जन्म हवा आहे त्यांनी जुन्या वहीवाटांचा त्याग करणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रतीकात अडकलेली मानसिकता मुक्त आकाशात झेप घेऊ शकत नाही.

-सुधाकर सोनवणे,बीड

Sonawanesudhakar4239@Gmail.com

मो.9763434239


 

 



 



 















ReplyForward