घणसोली विभागातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेत
आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या गतीमान कार्यवाहीसाठी मौल्यवान सूचना
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेणे व त्यांचे त्वरित विलगीकरण करून त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही ॲन्टीजेन तपासणी करणे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देत मृत्यूदर कमी करणे हे आपले प्रमुख ध्येय आहे अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घणसोली विभाग कार्यालयाच्या आढावा बैठकीप्रसंगी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना दिल्या. त्याचप्रमाणे तिस-या कॅटेगरीतील कन्टेनमेंट झोनमध्ये पोलीस विभागाने लॉकडाऊनचे नियम पाळले जातील याकडे अधिक काटेकोरपणे लक्ष द्यावे असे पोलीस निरीक्षक यांना सूचित केले.
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी विभागीय स्तरावर कशा रितीने होते याचा आढावा घेऊन त्याला अधिक चालना देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर विभाग कार्यालयांना भेटी देत असून घणसोली विभाग कार्यालयाला भेट देत त्यांनी मौल्यवान सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
घणसोली विभाग कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गावे आणि एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी अशी दाटीवाटीची वस्ती असून या भागांकडे आयुक्तांनी अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, हायब्लडप्रेशर, ह्रदयरोग अशा इतर आजार असणा-या व्यक्तींची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत त्यादृष्टीने त्यांची नोंदणी करून प्रत्येकाची अँटिजेन टेस्ट करण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे त्यांनी निर्देश दिले. 'मिशन ब्रेक द चेन' च्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये कोरोना बाधिताचा शोध लवकर लागणे सर्वात महत्वाचे असून त्यामुळे त्याच्यापासून होणारा संसर्ग लगेच रोखता येईल याकडे कटाक्षाने लक्ष ठेवून शोध, तपासणी, विलगीकरण मोहिमेला गती द्यावी असे आयुक्तांनी निर्देश दिले.
तीन प्रकारच्या कन्टेनमेंट झोनपैकी तिस-या प्रकारच्या, एकाच भागात जवळजवळ कोरोना बाधित आढळलेल्या कन्टेनमेंट झोनमध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याठिकाणची भौगोलिक रचना लक्षात घेऊन बॅरेकेटींग करताना नागरिक ये-जा करू शकणार नाहीत अशा प्रकारे उंच बॅरेकेटींग करावे व तेथे 24 तास पोलीस बंदोबस्त राहील याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केवळ आरोग्य सेवेकरिता व अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणा-या व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही ये-जा करण्यास परवानगी न देता या क्षेत्रात कडक लॉकडाऊन पाळण्यात यावा व या कालावधीत कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांना औषधे, भाजीपाला, अन्नधान्य अशा अत्यावश्यक गोष्टी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था स्थानिक विभाग कार्यालयामार्फत करण्यात यावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्यानंतर त्या भागाचे निर्जंतुकीकरण व त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी असे स्पष्ट करीत त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध लगेच सुरू करावा असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. या सर्व बाबींच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सोसायटी, वसाहतीच्या पदाधिका-यांचे सहकार्य घ्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.
कोरोना बाधित आढळतात अशा ठिकाणी कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात येत असून तेथील प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत असतो. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यादृष्टीने नागरिकांच्याच आरोग्य हितासाठी हे करण्यात येत असून नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पूर्णत: पाळून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.