#अशोकरावलगेरहो



  _ _ _ _ _ _ _ _ _ _ _


आसमां को जिद है जहाँ
बिजलियाँ गिराने की I
हमे भी जिद है 
वहीं अपना आशियाँ बनाने की॥


आँधियों से कोई कह दो 
की औक़ात में रहे I
एक तिनके ने की है 
हिम्मत सर उठाने की ॥


 जिद्द, हिंमत अन् स्वाभिमान रक्तातच असलेला माणूस कधीच आणि कोणालाही घाबरत नसतो, असा या शेरचा मतिथार्थ. जीवनात कितीही आणि कसलीही वादळे आली तरी 'मोडेन पण वाकणार नाही' या बाण्याने तो ठामपणे उभा असतो, अशा माणसाला सलामच केला पाहिजे. असाच आमचा दिलदार अन् बाणेदार मित्र अर्थातच अशोक सुखदेव हिंगे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा शब्द प्रपंच.. 


   समाजभूषण अण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून राजकीय - सामाजिक जीवनात भक्कमपणे कार्यरत राहिलेला हा आमचा बीडचा युवा नेता. मराठा महासंघ, काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी अशा चळवळीतून गेल्या अडीच दशकांपासून कार्यरत आहे. बलभीम महाविद्यालयात शिकत असताना अशोकची भेट झाली. अजून मला आठवते, त्याकाळात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या अशोककडे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्षपद चालून आले. आ. विनायक मेटे, सुहास पाटील, रमेश पोकळे, प्रदीप धांडे, अंजली पाटील, प्रीती पवळ अशा अनेकांची जडणघडण महासंघाच्या चळवळीतून झाली. आमदार मेटे, अशोक यांनी तर सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करून आदर्श घालून दिला. बीडमधल्या अनेक सामाजिक आंदोलनात लाठ्या काठयाही खाल्ल्या. मराठा महासंघातून पुढे आलेल्या आमच्या या मित्राने नंतर अनेक वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली. माजी खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या निकटवर्तीयांपैकी विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. मध्यंतरीच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली. अगदी बँकेपासून ते नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आदी निवडणुकांमध्ये त्यांनी नशीब आजमावून पाहिले. यामध्ये यश  मिळाले नाही म्हणून काही त्यांनी सामाजिक कार्य अन् सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. पहिल्यापासूनच फुले -शाहू - डॉ आंबेडकर विचारधारा हाच त्यांच्या जगण्याचा श्वास आणि ध्यास राहिलेला आहे. त्यामुळे सर्व समाजात मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
विचार आणि तत्वासाठी अशोकरावांनी भल्याभल्यांना अंगावर घेतले मात्र तडजोड कधीच केली नाही. या स्वभावाची राजकीय किंमत त्यांना अनेक वेळा मोजावी लागली. मात्र पंचवीस वर्षे सार्वजनिक जीवनात राहूनही त्यांनी पाठीचा कणा कधी मोडू दिला नाही. एकदा दिलेला शब्दही त्यांनी कधीच फिरविला नाही. त्यांना दिलेला शब्द मात्र दुसऱ्यांनी कधीच पाळला नाही, तरीही ते कायम विचारावर अढळ राहिले. अनेक वेळा अशोकची त्यक्ती॥त बदनामीचे कट कारस्थान रचल्या गेले. मात्र प्रत्येक वेळी ते तावून सुलाखून बाहेर पडले. एकदा हातात घेतलेला कोणताही प्रश्न धसास लावेपर्यंत थांबायचे नाही, हा त्यांचा खाक्या राहिला आहे. या बळावरच सर्व समाजात मानणारा फार मोठा वर्ग अशोकरावांच्या मागे उभा असतो.
  
    राजकारणात एखादं पद मिळालं म्हणजे इप्सित साध्य झालं असं होत नाही तर अनेक वेळा विचार अन् तत्वासाठी लढाई लढायची असते. क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांना खासदार करणारा आपला बीड जिल्हा आहे. तर भाई जनार्दन तुपे यांच्यासारखा फाटका माणूसही याच जिल्ह्याने आमदार केलेला आहे. ही उदहारणे तशी अपवादात्मकच म्हणावी लागतील. त्यातून बीड जिल्हा म्हणजे राजकीय घराण्यांचे जणू टोळीयुद्धचं. या टोळ्यांचा पदासाठी आणि सत्तेसाठी इकडून तिकडे मुक्तसंचार सुरू असतो. सत्ताप्राप्ती हाच 'अजेंडा' असल्याने तीस वर्षांपासून उमेदवार तेच फक्त चिन्हांची आदलाबदली आपण पाहत आहोत . ज्यांना ज्यांना राजकारणात टिकून रहायचे आहे, त्यांना कोणत्यातरी टोळीशी संधान बांधावेच लागते. नाहीतर त्यांच्याशी उभे वैर पत्करावे लागते. म्हणजे कोणाच्या तरी वळचणीला जायचं, नाही तर खडकाला धडक देऊन कपाळमोक्ष करून घ्यायचा, एवढचं त्यांच्या हातात आहे. यापैकीच एक पर्याय बहुतांशी लोकांनी वर्षानुवर्षे निवडला आहे. यातून टिकून राहिलेल्या दोन - चार जणांचा अपवाद सोडला तर बाकी अनेक जण केंव्हाच बाद झाले. आपण मात्र नाबाद राहून आपला लढा जिद्दीने लढत आहात. आपल्या प्रमाणेच कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या  दिलीप गोरे, राजेश्वर चव्हाण, राजेसाहेब देशमुख, सुरेश हात्ते, पप्पू कागदे , सुभाष राऊत, रवींद्र दळवी, राजेंद्र मस्के, सय्यद नविदुज्जमा, सचिन मुळूक, प्रकाश जेधे यांच्याशी मैत्रीचे नाते पत्रकारितेच्या काळात जोडले गेले. नवनाथराव थोटे, महादेव धांडे, दिलीप वाघमारे, शेख बक्शू, रवींद्र दळवी आदी बोटावर मोजण्याएवढी मंडळी बीड शहर काँग्रेसमध्ये कार्यरत होती. विशेषतः अशोकरावांशी असलेली मैत्री या काळात अधिकच घट्ट झाली. आजही महत्वाच्या विषयावर आमची अधूनमथून चर्चा होत असते.
 
    राजकारणात मोठे व्हायला केवळ प्रस्थापित जातीत जन्म घेऊन चालत नाही. तर प्रस्थापित घरातल्या पाळण्यातून तुमचे बालपणीचे पाय जगाला दिसावे लागतात. कदाचित अनेकांना पटणार नाही परंतु हे कटू सत्य आहे. मात्र पुढच्या काळात हे दिवस नक्की बदलतील अन् घराणेशाहीचं जोखड जनता जनार्धन नक्की फेकून देईल. औषधाच्या बाटलीवर असते तशी पुढाऱ्यांच्या कपाळावर 'एक्सपायरी डेट' कधीच नसते. त्यामुळे आज ना उद्या आपली दखल नक्की घेतली जाईल. एखादी मात्रा लागू पडेल. गुंगीच औषध दिल्यामुळे बधीर झालेल्या समाजाला समज येईल. सम्राट अकबराच्या अंगठीत कोरल्याप्रमाणे 'ये दिन भी जायेंगे' अर्थात हेही दिवस जातील अन् ऐन तारुण्यात आपण पाहिलेलं स्वप्न पन्नाशीनंतर तरी नक्की साकार होईल, त्यामुळे आताच मैदान सोडून चालणार नाही..