<no title>

पनवेल महानगरपालिका करणार  मास्क न वापरण्यावर कडक  दंडात्मक कारवाई
(पनवेल प्रतिनिधी शशिकांत चव्हाण) :
     पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. आजपर्यंत कामोठे आणि खारघर वगळता उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात होते. मात्र, आता दाट लोकवस्तीच्या भागातदेखील रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. लॉकडाऊन शिथील होत असल्यामुळे लोकांचा संचार वाढला आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करुन देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत.


लहान मोठ्या खरेदी करण्यासाठी घरातील एका पेक्षा जास्त सदस्य बाहेर जात आहेत. यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क वाढला आहे.
त्यातही काही बेजबाबदार नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.


ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी चारही प्रभागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना आणि दुकानदारांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून 100 रुपयांचा भुर्दंड आकारण्यात येत आहे. खारघर, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करत करत आहेत
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून एक परिपत्रक जाहीर केले होते. त्यानुसार, महानगर पालिका हद्दीतील नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालने बंधनकारक केले आहे. मास्क न घातलेल्या व्यक्तीवर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.


सर्व व्यक्ती ह्या कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ता, रुग्णालय, कार्यालय, बाजारपेठ, इत्यादी ठिकाणी जात असल्यास मास्क परिधान करणे अनिवार्य आहे 
कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करताना देखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.