जनसामान्यांचे कैवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
समाजातील सुख दु:ख जाणणारे, समाजातील तळागाळातील लोकांच्या व्यथांना सर्वांसमोर सादर करणारे, दिन दुबळयाना न्याय मिळवून देणारे फार थोडे असतात.आशा या थोडया जाणकारात साहित्य महर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा क्रमांक वरचा आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे गोरगरीब, दिन, दुबळे, मागासवर्गीय यांचे कैवारी होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा, कथा, प्रत्यक्ष जीवन चित्र सर्वांसमोर मांडले.
महाराष्ट्राच्या स्फुर्ती गीतातून अण्णा भाऊंनी महाराष्ट्र भांडवलदारापासुन मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना व कामगारांना आपली कंबर बांधून लढण्याची प्रेरणा दिली. तसेच ही पृथ्वी शेषनागाच्या शिरावर नसून कामगारांच्या हातावर आहे. हा संदेश ही अण्णाभाऊंनी दिला. अशा या थोर समाज व्यथा जाणकाराचा जन्म १ आॅगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊंचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. दलित शोषितांच्या वाट्याला प्रचंड दारिद्रय होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा उपासमारीची वेळ येत होती. चार लेकराच्या तोंडात दोन वेळेचा घास घालणे अत्यंत अवघड होते.
वाटेगावच्या पुर्वेस निवडुंगाच्या दाट झाडीत मातंग समाजाच्या शंभरावर झोपड्या होत्या. त्या प्रत्येक झोपडीत भुक, रोगराई, दारिद्र्य, दुष्काळ, अज्ञान आणि अंधश्रद्धेने ग्रासलेले होते. आशा विषम परिस्थितीत अण्णांना प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत दाखल करण्यात आले. मात्र उच्चवर्गीयांची मिरासदारी असलेले शिक्षण अण्णाभाऊ च्या मनाला भावले नाही. केवळ दिड दिवस शाळेत जाऊन त्यांनी या भेदभावांच्या शिक्षणाला नाकारले. अण्णाभाऊंनी वाटेगावच्या दलितांच्या व्यथा न्याहाळल्या होत्या. ते ११ वर्षाचे असताना त्यांनी वाटेगाव सोडले. कारण वाटेगावात अस्पृश्यता पाळल्या जात होती. दलितांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत होते. अण्णाभाऊंचे कुटुंब मुंबई ला चालत आले व तेथेच स्थायिक झाले.
मुंबईला आल्यावर अण्णाभाऊंना कसले शिक्षण? त्यानी आपल्या कुटुंबियांसोबत हमालीचे काम सुरू केले. झाडुवाला व फेरीवाल्यांची गाठोडी डोक्यावरून व पाठीवरून नेण्याचे काम त्यांनी केले व पोट भरू लागले. अण्णासाठी कसली शाळा? आणि कसले शिक्षण? मात्र हमालीचे काम करीत असताना अण्णाभाऊ साठे रस्त्यावर लावलेले दुकानाचे नामफलक वाचू लागले,सिनेमाचे पोस्टर्स व त्यावरील नाव वाचु लागले. रस्त्यावरील बोर्ड वाचून त्यांनी आपली वाचनाची भूक वाढविली.हळूहळू ते चांगल्या प्रकारे वाचु लागले, आपणही वाचु लिहू शकतो असे त्यांना वाटायला लागले, आपणही वाचु लिहू शकतो असे त्यांना वाटायला लागल्यावर त्यांचा आत्मविश्वास उंचावला व त्यांनी वाचनाचा सपाटा चालविला. वर्तमानपत्र, पुस्तके ते वाचु लागले, प्रचंड चिंतन व मनन यातुन अण्णा भाऊंच्या साहित्याची निर्मिती झाली.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचले म्हणजे समजते की अण्णाभाऊ साठे हे या विशवातील कष्टकरयाचे, पिडिताचे, दिन दुबळयाचे, शोषितांचे खरे प्रतिनिधी होते. अण्णांनी आपल्या साहित्यात समाजाचे वास्तव चित्रे लिहिलेले आहे. आपल्या लिखाणातून त्यांनी भटक्या विमुक्तांचे जीवन वर्णन केलेले आहे.
त्यांची भुक, गावकुसाबाहेरील जीवनशैली, पोलीस पाटील, सरपंच यांच्याकडून होणारे अन्याय, होणारे अत्याचार अवहेलना या सर्वाचे चित्रण करून ते समाजासमोर व राज्यकर्त्यांसमोर आणले. या त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या लिखाणातुन त्यांचे तत्कालीन समाजाबाबतचे प्रेम व दलिताविषयी, दिनदुबळयाची सामाजिक बांधिलकी निदर्शनास येते. अण्णाभाऊच्या लेखणीत वास्तवाची धार होती. सत्याची किनार होती अन् माणूसकीची झालर होती. स्वतः च्या लेखणीतून अण्णाभाऊनी स्वतंत्र, समता, न्याय आणि बंधुता या मानवी मुल्याचा विचार मांडला.
अण्णाभाऊ साठे हे पहिले दलित साहित्यिक आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्ती चळवळीचा अण्णाभाऊ वर फार मोठा प्रभाव होता. आर्थिक गुलामगिरी पेक्षा मानसिक गुलामगिरी भयानक असुन ही गुलामगिरी येथील समाजव्यवस्थेने निर्माण केली आहे. आशा जातियव्यवस्थेला गुलामीतून सुटण्यासाठी उठाव सुरू केला. त्यानी समतेवर आधारलेले माणूसकीचे नवे जग निर्माण करण्यासाठी चातुर्वण्यावर घाव घालणाऱ्या फुले, आंबेडकरांचा संदेश अण्णांनी शब्द बध्द केला.
" जग बदल घालूनी घाव | सांगुन गेले मली भिमराव ||
गुलामगिरी च्या चिखलातून|रूतुन बसला का एेरावत|
अंग झाडुनी निघ बाहेरी |घे बिनीवरती धाव ||
अण्णाभाऊ साठे ज्या समाजात जन्मले त्या समाजाला परिपूर्ण उभे करण्याचे काम त्यांनी केले. यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा आधार घेतला. समाजाच्या सुख दु:खात ते समरस झाले. त्यांच्या व्यथा जाणून त्या जगासमोर ठेवण्याचा त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या लिखाणाचे विषय म्हणजे त्यांच्या भोवतीचा दिनदुबळा, गोरगरीब व दलित समाज होय. बहुजन समाजाच्या मुक वेदनांचे, आक्रोशाच्या, भुकेच्या नि अन्याय अत्याचाराचे चित्रण अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातुन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. अण्णाच्या अनेक कांदबरयावर आधारित सिनेमा चित्रित झालेले आहेत. पोवाडे, कविता यातुन महाराष्ट्राच्या अस्मितेची व गौरवाची स्तुती केली. त्यांनी आपल्या लिखाणातून माणूस सतत जपला आहे. नितिमत्ता, प्रमाणिकता हे अण्णा भाऊंच्या जिव्हाळ्याचे विषय होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कांदबरया, कथासंग्रह, लोकनाट्य, नाटके, पोवाडे, शाहिरी ,चित्रपट कथा, माझा रशियन प्रवास आशी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली. तळागाळातील वर्ग अण्णांच्या लिखाणाचा विषय बनला होता. भारताच्या अन्यायग्रस्त समाजाची ओळख अण्णा भाऊंच्या लेखणीमुळे जगाला झाली. कामगार चळवळीतुन त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला होता. आशा या जनसामान्यांचे कैवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जितेंद्र औताने
E-mail-ajitendra99@gmail.com
मोबाइल नंबर- ९७६३७९५१९६
मा. संपादक साहेब
आपल्या लोकप्रिय दैनिकात वरील लेखास प्रसिद्धी द्यावी हि नम्र विनंती
आपला
जितेंद्र औताने
मोबाइल नं-९७६३७९५१९६