शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधू नका - किसान सभेची निदर्शने
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) :- लोकसभेत पाशवी बहुमताने आणि राज्यसभेत गोंधळाच्या वातावरणात पारित केलेली कृषी विषयक विधेयके तमाम शेतकर्यांना आत्महत्येच्या दिशेने नेणारी असल्यामुळे ती त्वरित रद्द करावीत या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने बीड कलेक्टर कचेरीसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
शेतकरी गैर प्रचाराचे बळी ठरत आहेत असे प्रधानमंत्री म्हणतात याचा अर्थ ते शेतकऱ्यांना वेडी ठरवीत आहेत. कंपनी आणि कंत्राटी शेती प्रोत्साहन किमान आधारभूत किमती ला बगल देणे, बाजार समित्यांचे अधिकार कमी करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कृषी उत्पादने वगळणे या सर्व बाबी भांडवली घराण्यांना पोषक आणि शेतकऱ्यांना घातक ठरणार आहेत, कोरोनाच्या आड दडून शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था देखील धोक्यात आणले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी काळी विधेयके रद्द करा शेतकरी विरोधी धोरणे घेणाऱ्या भाजप राजवटीचा आणि प्रधानमंत्री मोदी यांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या नंतर एकूण दहा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. त्यामध्ये काळी व शेतकरी विरोधी विधेयके रद्द करा, खाजगीकरण थांबवा, डॉक्टर स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी मान्य करा इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
निदर्शने करणाऱ्यामध्ये कॉम्रेड नामदेव चव्हाण, कॉम्रेड ज्योतीराम हूरकुडे, कॉम्रेड भाऊराव प्रभाळे, कॉम्रेड रामहरी मोरे, दत्ता भोसले, गणेश खंडागळे , नवनाथ वक्ते, धम्मा दहीवडे , अमर जान पठाण, ॲड फिडेल चव्हाण, ॲड अंबादास आगे, शेख मोहम्मद देविदास पवार , गोविंद साळवे, राजेंद्र कदम शरद पवार यांनी भागीदारी केली.