खाजगी रूग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश       


      कोरोना बाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रूग्णालयांनी महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या दि. 21 मे 2020 अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारावी याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.


      तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व 21 मे आणि 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन अधिसूचनेचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत असल्याने याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशा तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्त (1) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.


      याविषयी अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 उपचार करणा-या सर्व रूग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता 6 विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड रूग्णालयांमधील कोव्हीड 19 चा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी केली जात आहे.


      या पथकांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उपआयुक्त श्री. राजेश कानडे यांच्या समवेत विशेष आढावा बैठक घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पथकांना कालबध्द पध्दतीने विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व देयक तपासणीच्या त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती घेऊन त्यामध्ये सुधारणा सूचित केल्या.


      कोव्हीड रूग्णांवर खाजगी रूग्णालयांमार्फत शासनाने निश्चित केलेल्या दरांमध्येच योग्य उपचार केले जावेत व त्यामध्ये रूग्णाची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक व्हायला नको हा उद्देश स्पष्ट करीत सर्व रूग्णालयांकडून तशा प्रकारचे बंधपत्र लिहून घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. या लेखा परीक्षण समितीचा उद्देश देयकांमध्ये आकारण्यात आलेल्या विविध बाबींची दर पडताळणी हा असून त्यानुसार काम करून दर आठवड्याला पथकनिहाय तपशील आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


      पथकांना आत्तापर्यंत देयके तपासणी करताना आलेल्या अनुभवांची सविस्तर माहिती घेत आयुक्तांनी त्यामधील सुधारणांविषयी मार्गदर्शन केले व देयके तपासणी करताना वस्तुनिष्ठ काम होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.  


      खाजगी रूग्णालयांमधील कोव्हीड 19 विषयक उपचारांच्या देयकांबाबत नागरिकांना तक्रार दाखल करणे सोयीचे व्हावे याकरिता "कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)" कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी 022-27567389 हा हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप  क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.


      खाजगी रूग्णालयात उपचार करताना ते शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क आहे. तरी नागरिकांनी खाजगी रूग्णालयातील कोव्हीड 19 उपचारांच्या देयकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर करावी असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.