ठाणे , दि. 22 - कोरोना महामारीच्या युध्दात प्रत्यक्ष उतरुन निस्वार्थीपणे अतुलनीय कामगिरी केलेल्या प्रभागातील रहिवासी व प्रभागात सेवा देणाऱया कर्तृत्ववान 100 महिलांचा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर `कोरोना रणरागिणी' पुरस्काराने शिक्षण समिती सभापती, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी सन्मान केला.
कोरोना महामारीच्या युध्दात फ्रंटफूट वर महिला काम करत आहेत. सफाईकामगार, आरोग्य सेवेतील काम करणाऱया डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, पोस्टमन, विविध शासकीय, निमशासकीय आणि पालिकेत काम करणाऱया या महिला जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्व महिलांनी केलेल्या कामाची दखल घेतली जावी म्हणून नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी या महिलांना कोरोना रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. या सर्व महिलांच्या कामाच्या ठिकाणी आणि घरी जाऊन त्यांचा सन्मान केला गेला.
यात प्रभागात सफाई काम करणाऱया स्वच्छतादूत, काजुवाडी, नौपाडा, शिवाजी नगर येथील डॉक्टर, नर्सेस, डॉक्टर समिधा गोरे,ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्राणाली घोंगे, ठाणे महापालिकेच्या डॉक्टर देवगीकर, वागळे पोलिस ठाण्याच्या वैशाली रासकर, महिला पोस्टमन, सिव्हिल रुग्णालयातील स्टाफ यांचा सन्मान नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी साडी, शाळ, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन केला.