उरण-पनवेल तालुक्यातील बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.






उरण-पनवेल तालुक्यातील बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.

 

सुवर्णसंधीचे लाभ घेण्याचे कॉमरेड भूषण पाटिल यांचे आवाहन.

 

नावनोंदणीसाठी तसेच भर्ती प्रक्रिया संदर्भात प्रमोद ठाकुर फोन नं 9220849857 यांच्याशी संपर्क साधावे.

 

उरण दि २६(विट्ठल ममताबादे)

 औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात मोठ-मोठे जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रकल्प आहेत. उदाहरणार्थ, जेएनपीटी येथील दुबई पोर्ट, सिंगापूर पोर्ट, जीटीआय पोर्ट ही खाजगी बंदरे, सिडको विभाग ३० कंटेनर गोडाऊन (CFS), अनेक कार्यालये, सेझ व नागरी वसाहती इत्यादी. याठिकाणी हजारो सुरक्षा रक्षकांची गरज आहे.

               महाराष्ट्रात सुरक्षा रक्षक कायदा १९८१ लागू आहे. त्या कायद्याप्रमाणे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. त्याचे कार्यालय खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे आहे. या सुरक्षा रक्षक कायद्याप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे (GR) फक्त आणि फक्त याच बोर्डामार्फत सुरक्षा रक्षक भरती करणे, कायदेशीर बंधनकारक आहे. खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीतर्फे सुरक्षा रक्षक भरती करताना कामगार मंत्रालयातून अनुबंधन म्हणजेच सूट (Exemption) घेणे बंधनकारक आहे. तसे न दिसल्यास ते सुरक्षा रक्षक बेकायदेशीर ठरविण्यात येतात. या बोर्डामध्ये प्रथमतः उमेदवारास नोंदणी करणे बंधनकारक असते. त्याकरिता लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि शारीरिक चाचणी ही भरती प्रक्रिया ऑनलाइनद्वारे होत असते.

         शासनाचा आदेश सांगतो, त्या तालुक्यातील प्रकल्पात त्या तालुक्यातील ८० टक्के युवकांना नोकऱ्या देण्यात याव्यात. ते उपलब्ध नसतील. तर लगतच्या तालुक्यातील युवकांची भरती करावी. पूर्वी हे काम करायला स्थानिक तरुण तयार होत नव्हते. परंतु आता कमीत कमी शिक्षण आठवी असताना पदवीधर तरुण-तरुणी हे काम करण्यासाठी तयार झालेले आहेत.

           उरण तालुक्यातील प्रकल्पामध्ये प्रथमतः उरण तालुक्यातील व नंतर पनवेल व पेण तालुक्यातील तरुणांची भरती करावी. या मागणीचे एक निवेदन महाराष्ट्राचे कामगार मंत्री मा. दिलीप वळसे-पाटील यांना दिलेले आहे व त्यांच्यासोबत या विषयावर बैठकीसाठी वेळ मागितलेला आहे. सर्व बेकायदेशीर भरती रद्द करून फक्त उरण तालुक्यातील तरुणांना या नोकर्‍या मिळू शकतात. उरणमधील नुकतेच २५ तरुण सुरक्षा रक्षक सेवेत रुजू झालेले आहेत.या नोकरीसाठी वेतन रुपये २४००० प्रति महिना आहे. या कामासाठी धुतूम गावचे व जेएनपीटी कामगार १९८४ शेतकरी आंदोलनात गोळीबारितील जखमी कॉ.प्रमोद ठाकूर प्रचंड मेहनत घेत आहेत. तसेच सुरक्षा रक्षक या सेवेत तरुणांनी रूजू झाल्यानंतर आपली सेवा ही प्रामाणिकपणे पार पाडावी. ही आपणास विनंती आहे. म्हणून या सुवर्णसंधीचा लाभ उरण तालुक्यातील तरुण-तरुणींनी घ्यावा. आपला हा कायदेशीर हक्क लढून मिळवावा.अधिक माहितीसाठी कामगार प्रतिनिधि प्रमोद ठाकुर फोन नंबर-9220849857 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन सर्व बेरोजगार युवक-युवतींना JNPT(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट)चे विश्वस्त कॉमरेड भूषण पाटिल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.