छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविले १ वर्षाच्या बाळाचे प्राण


 


ठाणे(29) : ठाण्यातील  दिव्या उमाशंकर यादव हे १ वर्षाचे बाळ पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झाल्याने त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यास बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे.


 


      मंगळवार दिनांक 27 ऑक्टोंबर, 2020 रोजी  ठाण्यातील वाघोबा नगर, कळवा येथील चाळीत राहणारे दिव्या उमाशंकर यादव हे बाळ खेळत असताना पाण्याचा बादलीत पडले. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते बेशुद्ध झाले. त्याच्या आईवडिलांनी त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता हॉस्पिटलने दाखल करण्यास नकार देवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळाला आणताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. भरती करताना बाळ बेशुद्ध अवस्थेत होते, त्याचे शरीर थंड पडले होते. बाळाला आकडी येऊन रक्तदाबही कमी झाला होता.


 


     छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाच्या आकडीवर तात्काळ उपचार सुरु करून फुफ्फुसातील पाणी काढले. बाळाला ऑक्सिजन लावून तब्बेत स्थिर केली आहे. रुग्णालयातील बालरोग विभागातील विभागप्रमुख प्रा. डॉ. वंदना कुमावत, सहयोगी प्रा. डॉ. शैलजा पोतदार, अधिव्याख्याता डॉ. श्रीकांत जोशी, रेसिडेन्ट डॉ. पियुष व डॉ. नीरा यांच्या अथक व तातडीच्या प्रयत्नांमुळे १ वर्षाच्या चिमुकलीला जीवदान मिळाले आहे.  सध्या या बाळाची तब्बेत स्थिर असून जीवावरचा धोका टळला आहे. दरम्यान बाळाच्या पालकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.