पर्यटनावर अवलंबून असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना वेळोवेळी भेडसावत असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधीना तसेच या स्थळाच्या विकासासाठी कार्यतत्पर असणाऱ्या अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यासाठी दि.२७ रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावण्यात आली होती.
सदरची बैठक आयोजित करण्यात यावी यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दि.७ फेब्रुवारी महिन्यात आदित्य ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानुसार ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत, तसेच मा प्रधान सचिव वने,पर्यावरण,पर्यटन,नगरविकास,एमएमआरडीए चे आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, प्रांत अधिकारी कर्जत तसेच मुख्याधिकारी प्रशांत जाधव हे या विशेष महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माथेरान मधील विकासकामबाबत आणि समस्यांबाबत चर्चा करून या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. माथेरानशी नेहमीच आदित्य ठाकरे यांचे संबंध राहिलेले असल्याने येथील नागरिकांच्या तसेच येणाऱ्या पर्यटकांना काय बाबींची आवश्यकता आहे याची जाणीव त्याना असल्याने लवकरच हे स्थळ विकसित करण्यात येणार आहे अशी ग्वाही सुध्दा यानिमित्ताने ठाकरे यांनी दिली आहे.
या विशेष बैठकी दरम्यान पीपीई चे सादरीकरण माथेरान नगरपरिषदेचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी आपल्या प्रस्तावनेत मान्यवरांच्या समोर केले.त्यामध्ये त्यांनी माथेरानच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा देऊन पर्यावरणाचा समतोल सांभाळून पर्यटनास चालना देणे आणि पर्यावरण पूरक विकास करणे शक्य असून स्थानिकांना व सुशिक्षित बेरोजगार यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल असे स्पष्ट केले. परिवहन सेवा बाबत माहिती दिली माथेरानला पर्यटनाचा विशेष दर्जा देण्यात यावा याचीही मागणी करण्यात आली. माथेरान सनियंत्रण समिती आणि त्याबाबतीत असलेल्या अडचणी ,
माथेरानची प्रसिद्धी (ब्रँडिंग) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत करण्यात यावी याचाही आग्रह धरण्यात आला. हेल्थ टुरिझम साठी प्रयत्न करणे बाबतही चर्चा झाली.तर
soil conservation,वन विभागाच्या परिसराला फेंसिंग,झाडांचे सर्वेक्षण, व्हॅली क्रॉसिंग/साहसी खेळ परवानगी, वाहतूक आणि मालवाहतूक समस्या,पर्यायी मार्ग-रोप वे/फिनिक्युलर रेल्वे सुरू करणे, निवास व न्याहरी योजना सुरू करणे, विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय, पेमास्टर /पांडे गार्डन विकसित करणे अथवा थीम पार्क बनविने,फॉरेस्ट पार्क सुशोभिकरण, आकाशगंगा प्रकल्प नूतनीकरण, झरे-पाण्याचे स्तोत्र पुनर्जीवित करणे,
या महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली.त्यामध्ये soil conservation, साहसी खेळ, पर्यायी मार्ग- रोप वे, विध्यार्थी च्या शिक्षणाची होणारी गैरसोय, वाहतूक-मालवाहतूक समस्या, झरे-जलस्त्रोत पुनर्जीवित करणे याबाबत तात्काळ सविस्तर माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी सदर विभागाला ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.
तसेच एक महिन्याच्या कालावधी नन्तर पुन्हा एक आढावा बैठक घेण्यात येईल आणि माथेरानचे सर्व महत्वाचे प्रश्न टप्याटप्याने सोडवण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचित केले. स्पोर्ट्स टुरिझमसाठीही प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले,बॅटरी वेहीकल सुरू करणेसाठी घोडेवाले यांना विश्वासात घेणे जरुरीआहे हे सांगितले, एक दिवसाचे झालेले पर्यटन पर्यावरणाचा समतोल राखून कमीतकमी दोन दिवस आणि अधिक दिवसांचे कसे वाढवता येईल या वर भर दिला पाहिजे आणि त्यातून स्थानिकांना रोजगार निर्माण करणे हे उद्दिष्ट राहील आणि माथेरान ची ओळख ही "माथेरान" म्हणून अबादित ठेवण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी माथेरानच्या विकासाचा रोडमॅप बनविण्याचे आदेश सुध्दा अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत.माथेरान युथ सोशल क्लबचे अध्यक्ष प्रशाम दिवाडकर,
कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक संकेत भासे, बालाजी फेरे, वैभवजी लकुर आदी उपस्थित होते.