~ फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विवेक महाजन यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे 66 वर्षीय कल्याणकराला मिळाले जीवनदान ~
2 ऑक्टोबर रोजी एका 66 वर्षीय पुरुष रुग्णास कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षामध्ये आणले गेले. धाप लागत असल्यामुळे या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. संपूर्ण तपासणी केल्यानंतर रुग्णाला इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विवेक महाजन यांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब धोक्याच्या पातळीपर्यंत वाढलेला होता. औषधांच्या मदतीने हा रक्तदाब काही प्रमाणात खाली आणण्यामध्ये तसेच फुफ्फुसांना आलेली सूज कमी करण्यामध्ये काहीसे यश आले. रुग्णाची 2D ECHO चाचणी केली असता हृदय निरोगी असल्याचे दिसून आले, मात्र उच्च रक्तदाबामुळे त्याच्या कार्यामध्ये बाधा येत होती. अँजिओग्राफीमधून रक्तवाहिन्यांत काही किरकोळ ब्लॉकेजेस दिसून आले. यानंतर रुग्णाची किडनी अँजिओग्राफीसह अधिक सखोल तपासणी करण्यात आली. तेव्हा किडनी आर्टरी म्हणजे मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करणा-या धमनीमध्ये ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. एका बाजूला 90% ब्लॉकेज होते तर दुसरी बाजू ब-यापैकी मोकळी होती. अँजिओग्राफीमध्ये आर्टरीमध्ये साठलेला कॅल्शियमचा जाड थर स्पष्ट दिसत होता.
हे ब्लॉकेज काढण्यासाठी रुग्णाला अँजिओप्लास्टी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. स्टेन्ट योग्य प्रकारे प्रसरण पावण्यासाठी कॅल्शियमच्या त्या दाट थराचे तुकडे करणे गरजेचे होते. पारंपरिक प्लास्टी बलून्सनी हे काम झाले नसते; आणि डायमंड कोटेड ड्रिल्स, हाय प्रेशर बलून्स आणि कटिंग बलून्ससारखी पारंपरिक तंत्रे वापरल्यास आर्टरीला इजा पोहोचण्याचा धोका होता. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी इंट्रा व्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी नावाच्या तुलनेने नव्या तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली. हृदय किंवा अवयवांतील आर्टरीजसाठी ही पद्धत ब-यापैकी प्रचलित आहे; मात्र किडनी आर्टरीसाठी या तंत्राचा वापर केला गेल्याचे जगभरात केवळ एकच उदाहरण नोंदवले गेले आहे. भारतात तर आजवर हा प्रयोग यापूर्वी कधीही केला गेलेला नाही. या पद्धतीमध्ये बलूनमध्ये असलेले दोन इलेक्ट्रोड्स विद्युतप्रवाहाद्वारे उष्णतेचे बुडबुडे तयार करतात. हे हीट बबल्स क्षणार्धात प्रसरण पावून पुन्हा मिटतात व या प्रक्रियेमुळे झटका बसून कॅल्शियमच्या ब्लॉकेजचे छोटे छोटे तुकडे होतात. यानंतर स्टेन्टचे प्रसरण सुलभ होते व उर्वरित प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करता येते.
या शस्त्रक्रियेच्या यशाबद्दल बोलताना फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विवेक महाजन म्हणाले, “हे यश साध्य केल्याबद्दल मला माझ्या टीमचा अत्यंत अभिमान वाटत आहे. साधारणपणे किडनी आर्टरीमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात, तेव्हा किडनीला होणा-या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो व त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो. ही गोष्ट काही संप्रेरकांना चालना मिळण्यास कारणीभूत ठरते व त्यातून रक्तदाब प्रचंड वाढून हृदयावर अतिरिक्त ताण येतो. हृदयाच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे फुफ्फुसांनाही सूज येते. या रुग्णाच्या बाबतीत पारंपरिक अँजिओप्लास्टी पद्धती 100% यशस्वी झाली नसती आणि म्हणूनच आम्ही इंट्रा व्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी तंत्राचा पर्याय वापरला. ही पद्धत देशात आजवर कधीही वापरली गेलेली नाही. ती यशस्वीपणे पार पाडण्याचे देशातील पहिलेवहिले उदाहरण ठरल्याचा तसेच त्यामुळे रुग्ण आपल्या आजारातून बरा झाल्याचा आम्हाला आनंद आहे.’’
रुग्ण श्री. भरत वाघ म्हणाले, “2 तारखेला जेव्हा मला अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले तेव्हा माझ्या पत्नीने मला तातडीने कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणले व इथे ही शस्त्रक्रिया पार पडली. पुन्हा आपल्या पायांवर घरी परतणे शक्य झाल्याचा मला अतिशय आनंद झाला. आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणेच माझी काळजी घेणारे डॉक्टर्स आणि नर्सेस यांचा मी खूप आभारी आहे.”
डॉ. विवेक महाजन पुढे म्हणाले, ‘’शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलविण्यात आले व तिथे त्यांच्या तब्येतील चांगली सुधारणा झाली. 19 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमध्ये दाखल करतेवेळी 160 (सिस्टॉलिक) वर पोहोचलेला रुग्णाचा रक्तदाब डिस्चार्जच्या वेळी रक्तदाब 120 (सिस्टॉलिक) इतका होता.‘’