नवी मुंबई महानगरपालिका
प्रसिध्दीकरिता
दि. 01/ 11 / 2020
कोरोना बाधितांमध्ये लक्षणीय घट - ऑक्टोबर महिना दिलासाजनक - मात्र बेसावधपणा नको
कोरोनामुक्तीचे प्रमाण - 93.90 % l मृत्यूदर - 2.02 % l डबलिंग रेट - 239 दिवस
'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात अनेक सेवा-सुविधांमध्ये सवलत मिळाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागल्याने सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन सगळीकडे काहीसे चिंताजनक वातावरण दिसू लागले होते.
याकडे गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्याकडे विशेष लक्ष दिले.
त्याला शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या राज्यस्तरीय विशेष अभियानाची 15 सप्टेंबरपासून जोड मिळाली आणि या मोहिमांची रूग्णशोध (Trace), तपासणी (Test) आणि उपचार (Treatment) ही उद्दिष्टांची त्रिसूत्री समान असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अभियांनाची प्रभावी रितीने अंमलबजावणी करण्याकडे आयुक्तांनी स्वत: काटेकोर लक्ष दिले. या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सर्वेक्षण करून रूग्णशोधाच्या कामाला गती देण्यात आली. राज्यातील महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईने उल्लेखनीय काम करण्याची नोंद घेण्यात आली. त्यासोबतच कोव्हीड 19 चाचण्यांच्या संख्या वाढीवरही भर देण्यात आला. मिशन बिगीन अंतर्गत उद्योगसमुह सुरू झाल्याने एम.आय.डी.सी. क्षेत्रात दोन कोव्हीड टेस्टींग सेंटर खुली करण्यात आली तसेच कंपन्यांमध्ये जाऊन कोव्हीड तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली.
सप्टेंबर महिन्यात 68357 चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यांची संख्या वाढवित ऑक्टोबर महिन्यात 84062 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत एकूण 2 लक्ष 81 हजार 867 इतक्या टेस्ट करण्यात आल्या असून लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे हे प्रमाण इतर मोठ्या शहरांपेक्षा अधिक आहे. सध्या दररोज 2600 ते 2800 चाचण्या करण्यात येत आहेत. ऑक्टोबर महिन्यात 84062 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 7848 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सप्टेंबर महिन्यातील चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 15.39% इतके होते. त्यात घट होऊन ते प्रमाण देखील ऑक्टोबर महिन्यात 9.33% इतके कमी झाल्याचे दिसून आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत एकूण 44521 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 41803 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 901 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 93.90 % हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.02 % हे प्रमाण सर्वाधिक आहे.
'मिशन ब्रेक द चेन' संकल्पनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावी रितीने केल्याने व एखादा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्याचे प्रमाण 24 व्यक्ती इतके चांगले ठेवल्याने आता रूग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोनातून बरे होणा-या रूग्णांचे प्रमाण सतत वाढत गेलेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस 32325 रूग्ण बरे होऊन घरी परतले होते ( 88.14 %) हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत जाऊन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस 41803 रूग्ण बरे होऊन घरी परतले (93.90 %) आहेत.
त्याचप्रमाणे रूग्णसंख्येची वाढही नियंत्रणात दिसत आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत 79 दिवसांवर असलेला रूग्णदुपटीचा कालावधीही ( Doubling Rate ) 31 ऑक्टोबरपर्यंत आता 239 दिवसांवर पोहचलेला आहे.
तसेच मृत्यूदरातही घट झालेली दिसत आहे. (2.02 %)*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्ता 31 ऑक्टोबर रोजी 1817 ( 4.08 %) इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत ॲक्टिव्ह असून 30 सप्टेंबरच्या तुलनेत (3598 रूग्ण, 9.81 %) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. 24 जून रोजी ॲक्टिव्ह रूग्णसंख्येने 2 हजाराची मर्यादा (2127) ओलांडलेली होती ती 28 ऑक्टोबरपासून पुन्हा 2 हजाराच्या खाली आलेली आहे.
एका बाजूला नव्याने कोरोना बाधित होणा-यांच्या संख्येतील घट आणि दुस-या बाजूला बरे होणा-यांच्या प्रमाणात होत असलेली वाढ यामुळे शहरातील कोव्हीड उपचारार्थ असलेले बेड्स रिकामे असल्याचे चित्र दिसत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील बेड्सची आकडेवारी तपासली असता एकूण 6073 बेड्सपैकी 4396 बेड्स उपलब्ध असल्याचे दिसत आहे.
जुलै, ऑगस्ट महिन्यात नवी मुंबईत बेड्स त्यातही आयसीयू बेड्स उपलब्ध होत नसल्याची ओरड होत होती. याकडे बारकाईने लक्ष देत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्वसाधारण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेड्सचे योग्य नियोजन केले आणि 3 महिन्यात आरोग्य सुविधावाढीवर भर दिला. 3 महिन्यात उपलब्ध आरोग्य सुविधांत तिपटीने वाढ केली. आता रूग्णसंख्या कमी होत असल्याने महानगरपालिकेच्या 8 कोव्हीड केअर सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात रूग्ण दाखल करणे थांबविण्यात आले आहे. मात्र रूग्णसंख्येत घट होणे ही समाधानकारक बाब असली तरी गाफील न रहाता आयुक्तांनी सर्वांना दक्ष राहण्याचे निर्देश दिलेले आहेत व नागरिकांनाही तसे आवाहन वारंवार केले जात आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून एका बाजूला दररोज आढळणा-या रूग्णांची संख्या घटत असल्याचे तसेच दुसरीकडे कोरोनातून बरे होणा-यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र समाधान देणारे असले तरी कोणीही बेफिकीर राहून चालणार नाही. सद्यास्थितीत 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत विविध सेवा नागरिक वापरासाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे आता अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
कोव्हीड 19 विषाणूचा प्रसार संसर्गातून होत असल्याने मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे हीच बचावाची त्रिसूत्री आहे. त्यामुळे या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे हे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य हितासाठी आहे. सदर नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाईसाठी महानगरपालिकेने दक्षता पथके नेमली असून त्यांच्यामार्फत 50 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे. या सर्व उपाययोजना नागरिकांच्याच आरोग्य हितासाठी करण्यात येत आहेत.
आगामी दिवाळीच्या कालावधीत तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही आपल्यामुळे गर्दी होणार नाही व गर्दीत आपण जाणार नाही याची दक्षता घेत प्रत्येकाने आरोग्य सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आपले नवी मुंबई शहर कोरोनामुक्त होण्यासाठी सतर्क रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.