नागपाडा येथील व्यापारी वर्गांना नुकसान भरपाई देण्याची पुखराज सुथार यांची महाराष्ट्र शासनाकडे मागणी. 


 

 

उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )दि 22 ऑक्टोबर 2020 रोजी सिटी सेंटर मॉल, नागपाडा, मुंबई सेंट्रल येथे लागलेल्या आगीमुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेथील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या व्यापारी वर्गांना आर्थिक नुकसान  भरपाई देऊन त्यांना मदतीचा हात द्यावा  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार यांनी  मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्याकडे एका निवेदनपर पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. 

 

दि 22 ऑक्टोबर 2020 रोजी सिटी सेंटर मॉल, मुंबई सेंट्रल येथे रात्रीच्या वेळेस अचानक लागलेल्या आगीमुळे सदर मॉल संपूर्ण जळाले आहे. व आगीमुळे सिटी सेंटर मॉल मध्ये असलेल्या दुकानदारांचे प्रचंड व कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. बहुतेक सर्वच दुकानदारांची संपूर्ण जमा पुंजीच यात कामी येऊन  त्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून सिटी सेंटर मॉल, मुंबई सेंट्रल येथील  त्रस्त व्यापारी वर्गाला त्यांचा नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सरकारने पंचनामे करून विशेष आर्थिक योजना जाहीर करावी व आगबाधित व्यापारी वर्गाला यथा संभव सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती तथा मागणी पुखराज सुथार यांनी महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.